आयुष्याची दोरी जिथे बळकट असते, तिथे मृत्यूही हतबल होतो, अशीच एक थक्क करणारी घटना नंदुरबार जिल्ह्यातील सूर्यपूर येथे घडली आहे. उलट्या आणि अतिरडण्यामुळे बेशुद्ध पडलेलं दोन महिन्यांचं बाळ मृत घोषित केलं गेलं होतं, मात्र डॉक्टरांनी केलेल्या एका साध्या चाचणीमुळे सर्वांनाच धक्का बसला.
तेलखेडी येथील मिनाबाई पावरा या महिलेसोबत तिचं दोन महिन्यांचं बाळ होळी निमित्त सूर्यपूर येथे गेलं होतं. अचानक बाळाला प्रकृती बिघडल्यामुळे ते निपचित पडलं आणि कोणतीही हालचाल होत नव्हती, त्यामुळे कुटुंबीयांना बाळ दगावल्याचा संशय आला. घरात रडारड सुरु झाली, मात्र खात्री करण्यासाठी बाळाला जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं.
डॉक्टरांच्या टिचकीनं बदललं नशीब !
आरोग्य केंद्रात डॉक्टर गणेश तडवी यांनी बाळाची तपासणी केली. त्यांनी अनुभवाच्या जोरावर बाळाच्या पायाला हलकं टिचकी मारली आणि आश्चर्यकारक घटना घडली—बाळाने मोठा श्वास घेतला! बाळ जिवंत असल्याचं पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डॉक्टर तडवी यांनी योग्य वेळी तपासणी करत बाळाचं प्राण वाचवल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना देवदूत मानलं आहे.
ही घटना आता नंदुरबारसह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली असून डॉक्टरांच्या तात्काळ निर्णयामुळे एक कोवळं आयुष्य वाचलं आहे.