नंदुरबार: आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देत सर्वांची दखल घेतली. रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत असताना त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आरोग्य सेवांबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत कोकाटे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
राज्याचे कृषिमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी केली भ्रमणध्वनीद्वारे चर्चा:
वारंवार होणाऱ्या 108 रुग्णवाहिकांच्या बिघाडावर राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ लक्ष केंद्रित केले. सोबतच, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबीटकर यांच्यासोबत कोकाटे यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. नंदुरबारसारख्या दुर्गम भागासाठी नवीन 108 रुग्णवाहिकांची तातडीने आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आरोग्यमंत्री आबीटकर यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांना दिले. त्याचप्रमाणे, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही कोकाटे यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावर 'भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल', असेही सांगण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सखोल पाहणी केली:
अपघात कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष आणि प्रसूती कक्ष यांची सखोल पाहणी करताना त्यांनी औषध साठ्याचीही माहिती घेतली. आवश्यक असल्यास तातडीने औषध पुरवठा करण्याचे आश्वासन कोकाटे यांनी दिले. 'सिकलसेल आणि इतर गंभीर आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना सवलतीच्या दरात रक्तबॅग उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपाययोजना करावी', अशी सूचना देखील त्यांनी केली.
कोकाटे यांनी साधला रुग्णांशी संवाद:
पुरुष कक्षातील अन्न आणि सेवा व्यवस्थेची चौकशी करताना त्यांनी रुग्णांची मते जाणून घेतली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते, तहसीलदार मिलिंद कुलथे, डॉ. अभिजीत मोरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला निश्चितच नवी दिशा मिळणार असून पालकमंत्री कोकाटे यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि तत्पर सेवा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली.