मुंबई: 'भारतीय क्रिकेटला दिशा देणारे, त्याला आकार देणारे, आणि जागतिक स्तरावर पोहोचवणारे नेते म्हणजे शरद पवार साहेब. त्यांच्या योगदानाचे स्मरण प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात सदैव राहील,' असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या एका कार्यक्रमात काढले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'आपल्याला अभिमान वाटावा अशा व्यक्तींना आपण गौरवले पाहिजे. क्रिकेटच्या क्षेत्रात पवार साहेबांनी प्रशासक म्हणून जो लौकिक मिळवला, तो अपूर्व आहे. त्यांनी केलेले काम केवळ मोठं नाही, तर प्रेरणादायीही आहे.'
ते पुढे म्हणाले, '1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच परदेशात मालिका जिंकून इतिहास रचला होता. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या खेळाडूंमार्फत नवनवीन शिखरं गाठतो आहे.'मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमोल काळे यांच्या निधनावरही भावनिक शब्दांत शोक व्यक्त केला. 'अमोल काळे एक उत्तम प्रशासक होते. जो त्यांना भेटायचा, तो त्यांचा होऊन जायचा. त्यांचा क्रिकेटसाठी असलेला ध्यास विलक्षण होता. त्यांच्या स्वप्नांची पूर्ती एमसीए नक्की करेल,' असे त्यांनी सांगितले.
रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'रोहित शर्मा मैदानात आला की प्रेक्षक भारावून जातात. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका, प्रत्येक षटकार, हे एक दृश्य असतं. आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या नावाने स्टॅण्डला नाव देणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.'वानखेडे स्टेडियमविषयी बोलताना ते म्हणाले, 'हे केवळ एक स्टेडियम नाही, तर क्रिकेटची पंढरी आहे. इथे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. आणि आता एमसीएने प्रस्ताव दिल्यास, आम्ही मुंबईत एक लाख क्षमतेचं नविन स्टेडियम उभारण्यासाठी जागा देऊ.'
एमसीएच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे स्मरण करत, मुख्यमंत्री म्हणाले, 'शतकपूर्तीच्या या टप्प्यावर मुंबईसारख्या शहरात एक भव्य स्टेडियम आवश्यक आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.'कार्यक्रमात खेळाडू, क्रिकेट प्रशासक, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रिकेटप्रेमींमध्ये या घोषणा आणि गौरवोद्गारांनी उत्साहाची लाट निर्माण केली आहे.