पुणे : पुण्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेला प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करण्याआधी रूग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले होते. गर्भवती महिलेवर वेळेवर अपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले आहेत. पेशंटच्या नातेवाईकाला जेवढे पैसे आहेत.. तेवढे भरा असे सांगितलं होतं. पण नातेवाईक पेशंटला स्वतःहून घेऊन गेले, अशा प्रकारचं प्रत्युत्तर रुग्णालयाकडून देण्यात आले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसृती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरुन दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.
हेही वाचा : सत्ताधारी आमदाराचा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप
दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या घटनेवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी आम्ही नोंद घेतली आहे. उचित कारवाई करणार आहोत. भाडेतत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात. त्या अटी शर्थी बघून निर्णय घेऊ. कडक कारवाई करणं आवशक असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी म्हटले आहे.तसेच रिपोर्ट आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं ते कळेल. चूक कोणाची आहे? हे नेमकं रिपोर्ट आल्यानंतर कळेल. दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. केस पेपर आम्ही बघणार आहोत असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले आहे.
पुण्यातील प्रकरण काय?
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांच्या सोबत धक्कादायक घटना घडली आहे. सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे ही गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले. त्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवतीला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले होते. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील अमित गोरखे यांनी केली.