पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा नागपूर दौरा भव्य स्वागत आणि विविध कार्यक्रमांनी गजबजलेला असेल. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात विशेष तयारी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील 47 प्रमुख चौकांमध्ये शक्तिप्रदर्शन आयोजित केले असून, आकर्षक सजावट आणि पारंपरिक वेशभूषेत मोदींचे स्वागत होणार आहे.
मोदींच्या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. सकाळी 8:30 वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते डॉ. हेडगेवार स्मारक आणि दीक्षाभूमीला भेट देतील. माधव नेत्रालयाच्या विस्तारिकरणासाठी आयोजित भूमिपूजन सोहळ्यातही ते सहभागी होतील. दुपारी ते बाजारगावातील सोलार प्लांटची पाहणी करून 12:30 वाजता नागपूरहून पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील.
या दौऱ्यात मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण नागपूर शहर या ऐतिहासिक दौऱ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा खास ठरणार आहे.