Sunday, August 31, 2025 11:53:45 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंगळुरात हाय अलर्ट

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंगळुरात हाय अलर्ट

बंगळूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. विशेषतः कर्नाटक सरकारने राज्यात अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेत कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. पहलगाम हल्ला हा पुलवामानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला असून, या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू, तर 17 जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये बेकायदेशीर नागरिक, विशेषतः पाकिस्तानी नागरिक आणि स्लीपर सेलच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले की, राज्यात बेकायदेशीरपणे राहत असलेल्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारनेही पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास मनाई केली असून, त्यांना दिलेले सार्क व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. राज्यात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय आढळणाऱ्यांना त्वरित देशाबाहेर पाठवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात विशेषतः बंगळुरु शहरात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या शक्यतेवरून अधिक काटेकोर तपासणी सुरू करण्यात आली आहे. राज्य पोलिसांनी लॉज, गेस्ट हाऊस आणि घनवस्त्यांमध्ये तपास मोहिमा राबवण्यास सुरुवात केली आहे. सीबीआय आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनाही स्थानिक पोलीस ठाण्यांना भेटी देण्याचे आदेश देण्यात आले असून, संभाव्य स्लीपर सेलच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय ठेवला जात आहे.

कर्नाटक विधानसभेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातून 137 बेकायदेशीर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 25 जण हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले असून, 84 जणांना बंगळुरुतून ताब्यात घेण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने यापुढील काळातही अशा मोहिमा अधिक तीव्रपणे राबवण्याचा निर्धार केला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दहशतवादी धोका राज्यात उद्भवू नये.


 


सम्बन्धित सामग्री