मुंबई: मागील 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार या आंदोलनात उपस्थित होते. त्यानंतर, स्वतः शरद पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले. शरद पवार म्हणाले की, 'शिक्षकांच्या मागण्या रास्त आहेत आणि शिक्षकांनी चिखलात बसून आंदोलन करणे योग्य नाही'.
काय म्हणाले शरद पवार?
आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनात शरद पवार म्हणाले की, 'गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित आहे', असं म्हणत त्यांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावले. विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जात आहे.
हेही वाचा: लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदने दिला मदतीचा हात
पुढे शरद पवार म्हणाले की, 'शिक्षकांच्या मागण्या महत्वाच्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. आंदोलनासाठी शिक्षक चिखलामध्ये बसत आहेत. हे बरोबर नाही'. 'तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदाना करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी केली आहे. 'शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू', अशी पवारांनी ग्वाही दिली. त्यासोबतच, पवारांनी सरकारकडे एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
नेमकं प्रकरण काय?
ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या अधिवेशनात राज्यातील सुमारे 5 हजार खाजगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 10 महिने होऊनही सरकारने अद्याप निधीची तरतूद नाही केली. यामुळे, शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, राज्यात 5 हजार 844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यात 820 प्राथमिक, 1 हजार 984 माध्यमिक आणि 3 हजार 040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3 हजार 513 प्राथमिक, 2 हजार 380 माध्यमिक आणि 3 हजार 043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8 हजार 602 प्राथमिक शिक्षक, 24 हजार 028 माध्यमिक शिक्षक, 16 हजार 932 उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.