Wednesday, August 20, 2025 09:17:37 PM

पानिपत शौर्य स्मारकासाठी निर्णायक बैठक सोमवारी मुंबईत

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला पानिपतचा युद्धसंग्राम अधिक उजळवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य स्मारक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे.

पानिपत शौर्य स्मारकासाठी निर्णायक बैठक सोमवारी मुंबईत

मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला पानिपतचा युद्धसंग्राम अधिक उजळवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य स्मारक प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी मुंबईमध्ये पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीसाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

मंत्रालयाच्या दालन क्रमांक 302 मध्ये ही बैठक पार पडणार:

ही बैठक सोमवारी दुपारी 2:30 वाजता मंत्रालयाच्या दालन क्रमांक 302 मध्ये पार पडणार आहे. बैठकीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मंत्री शंभूराजे देसाई तसेच शौर्य स्मारक समिती पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. यासोबत, समितीतील इतर मान्यवर सदस्य, तज्ज्ञ, इतिहास अभ्यासक आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहतील.

हे स्मारक राज्याच्या शौर्याचे प्रतीक ठरणार:

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याच्या शूर वीरांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि बलिदान लक्षात घेता, हे स्मारक केवळ एक इमारत न राहता, राज्याच्या शौर्याचे प्रतीक ठरणार आहे. या स्मारकात डिजिटल गॅलरी, संग्रहालय, वीरगाथा चित्रमालिका, शौर्य प्रशिक्षण केंद्र आदी सुविधांचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता आहे.

या बैठकीत स्मारकासाठी जागा निवड, निधी मंजुरी, आराखडा अंतिम करणे व कामाच्या वेळापत्रकावर सविस्तर चर्चा होणार आहे. महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे प्रतीक असणारे हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री