Conflicts ongoing between Laxman Hake and Kalyan Akhade: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थ खात्याच्या कार्यप्रणालीवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी हाके यांच्यावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निराधार आणि असत्य आरोप केल्याचा आरोप केला आहे.
कल्याण आखाडे म्हणाले, 'लक्ष्मण हाके हे दीड दिवसात विशिष्ट हवेवर स्वार होऊन पुढे आलेले नेते आहेत. त्यांना प्रसिद्धीची इंगळी चावली आहे. त्यामुळेच ते अजित पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि कार्यक्षम नेत्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.'
हाके यांनी अजित पवार यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी नीट पार पाडली जात नसल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना आखाडे म्हणाले, 'अजित पवार यांनी आतापर्यंत राज्याचा अर्थसंकल्प तब्बल दहा वेळा सादर केला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेला केंद्रीय अर्थ खात्याकडूनही गौरव प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशा नेत्यावर टीका करणे हे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे.'
हेही वाचा: बापरे! पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःच कबुल केली 'ही' धक्कादायक गोष्ट; नेमकं काय म्हणाले?
कल्याण आखाडे यांनी पुढे म्हटले की, 'लक्ष्मण हाके यांचे आरोप केवळ हवा निर्माण करण्यासाठी आहेत. अशा प्रकारच्या निराधार विधानांमुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण होतो. कोणत्याही विषयावर बोलण्याआधी माहिती आणि तथ्य यांचा अभ्यास करून वक्तव्य करणे आवश्यक असते. अन्यथा अशा आरोपांना कोणतेही महत्त्व राहणार नाही.'
राजकीय वर्तुळात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशा पार्श्वभूमीवर हाके यांचे वक्तव्य चर्चेत आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या आरोपांना महत्त्व न देता त्यांना थेट प्रसिद्धीची हाव असल्याचे म्हटले आहे.
एकंदरीतच, ओबीसी नेतृत्वामध्ये अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होत चालल्याचे या प्रसंगावरून स्पष्ट झाले आहे. एका बाजूला ओबीसी समाजाच्या हक्कासाठी विविध नेते लढा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीच्या हव्यासातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.