अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: लातूर शहरात शनिवारी एकाच दिवसात घडल्या. चोरीच्या सलग तीन घटनांमुळे चोरांच्या टोळीने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूर शहरातील औसा रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या समोर उभारलेल्या जीपमधून लेबर कॉन्ट्रॅक्टर मेजर माने यांची 30 लाखांची बॅग दिवसाढवळ्या चोरट्याने पळवली तर अंबाजोगाई रोडवरील केशवराव शाळेत पालक मेळाव्यासाठी आलेल्या अंजना मुरमुरे-असोले या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीवरून चोरटे पसार झाले. तर औसा रोडवरील एका मॉलसमोर पार्क केलेल्या अजय बोराडे नामक व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतील एक लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. या तीन घटनांमधील दोन घटनेचे सीसीटीव्ही पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असले तरी चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात लातूर पोलिसांना अद्याप यश आले नाही.
हेही वाचा: Ulhasnagar : उल्हासनगरात प्लेग्रुपच्या शिक्षिकेकडून अडीच वर्षीय चिमुरड्याला मारहाण
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात सलग तीन धाडसी चोरीच्या घडलेल्या घटनांनी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांची टोळी परराज्यातील असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे तपास यंत्रणेची विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.