मुंबई: हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्त्व आहे. या काळात, देवीने महिषासुराचा वध केला होता. हिंदू पंचंगानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. मात्र, यंदा ही तिथी 22 सप्टेंबर 2025 रोजी येत असून त्यादिवशी देवीची स्थापना होईल. त्यानंतर, नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाईल. सोबतच, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा होईल. पण तुम्हाला माहित आहे का? देवींची 51 शक्तीपीठ कशी निर्माण झाली? त्यासोबतच, देवींची 51 शक्तीपीठे कुठे आहेत? चला तर जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, आदिशक्तीचा जन्म प्रजापती दक्ष यांच्या घरी झाला होता. तिचे नाव सती ठेवण्यात आले. तरुणपणी सतीने स्वेच्छेने महादेवांशी विवाह केला. मात्र हा विवाह राजा दक्ष यांना कधीच मान्य नव्हते. यानंतर, राजा दक्ष यांनी भव्य यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञासाठी राजा दक्षने सर्व देवी-देवतांना, ऋषी-मुनींना आणि सतीच्या बहिणींना बोलावण्यात आले होते. मात्र, सती आणि महादेवांना आमंत्रण दिलेच नाही. त्यामुळे, सती राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली. सतीला पाहून राजा दक्ष प्रचंड संतापले आणि त्यांनी महादेवांचा अपमान केला. राज दक्ष यांनी महादेवांचा अपमान केल्याने सतीने आत्मदहन केले.
जेव्हा महादेवांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा महादेवांचा राग अनावर झाला आणि ते यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यानंतर, महादेवांनी सतीचा मृतदेह हातात घेऊन तांडव करू लागले. त्यामुळे, विश्वावर संकट ओढवू नये आणि महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या मदतीने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवरील विविध ठिकाणी पडले. ज्याठिकाणी देवीच्या शरीराचे तुकडे पडले, त्याठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. आज ही स्थळे देवीची पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून मानली जातात. त्यामुळे, भाविकांसाठी आजही ही 51 शक्तिपीठे भाविकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जेचे केंद्र आहेत.
हेही वाचा: Navratri Ghatasthapana Muhurat 2025 : शारदीय नवरात्रीला घटस्थापनेसाठी 'हे' 3 शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा आणि स्थापनेची अचूक पद्धत
देवींची 51 शक्तिपीठे 'या' ठिकाणी आहेत
हिंगलाज शक्तिपीठ: हिंगलाज शक्तिपीठ पाकिस्तान देशातील कराचीपासून 125 किलोमीटरवर आहे. पौराणिक कथेनुसार, याठिकाणी माता सतीचे मस्तक पडले होते.
ज्वालामुखी - सिद्धिदा: ज्वालामुखी - सिद्धिदा हे मंदिर हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळेपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी देवीच्या मूर्तीऐवजी अग्नीची पूजा केली जाते.
रेणुका मंदिर: रेणुका मंदिर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये हे शक्तिपीठ आहे. याठिकाणी माता सतीच्या डोक्याचा भाग पडला होता, त्यामुळे हे महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते.
कामाख्या: कामाख्या मंदिर आसाममधील गुवाहटी येथे आहे. या मंदिरात माता सतीची योनी पडली होती, त्यामुळे याठिकाणी माता सतीच्या योनीची पूजा केली जाते.
अवंती/महाकाली देवी: हे मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैनमध्ये आहे. याठिकाणी, माता सतीचा वरचा ओठ पडला होता, अशी मान्यता आहे. यालाच, अवंतिका शक्तिपीठ असेही ओळखले जाते.
ललिता / प्रयाग शक्तिपीठ : मान्यतेनुसार, प्रयागराज येथील ललिता शक्तिपीठमध्ये देवी सतीच्या हाताचा बोट पडला होता. या मंदिराला अलोपी देवी मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
विशालाक्षी / मणिकर्णिका : हे भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरात आहे. याठिकाणी देवी सतीचे कानातील दागिने पडले होते.
भबानीपूर शक्तिपीठ: भबानीपूर शक्तिपीठ बांग्लादेशमध्ये आहे. या ठिकाणी देवी सतीचा डावा कान पडला होता, अशी मान्यता आहे.
करवीर निवासिनी आई अंबाबाई : हे शक्तिपीठ महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात आहे. येथे देवी सती यांच्या डोळ्यांचा भाग पडला होता, अशी आख्यायिका आहे.
भवानी चंद्रनाथ मंदिर शक्तिपीठ : भवानी - चंद्रनाथ मंदिर शक्तिपीठ हे शक्तीपीठ बांगलादेशमध्ये आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीचा उजवा हात पडला होता.
त्रिस्रोता भ्रामरी शक्तिपीठ : हे शक्तिपीठ बंगालमधील सालबारी गावात स्थित आहे. अशी मान्यता आहे की, या ठिकाणी देवी सतीचा डावा पाय पडला होता. त्यामुळे, या ठिकाणी 'माता भ्रामरी देवी' मंदिर उभारले गेले.
सप्तशृंगी : सप्तशृंगी शक्तिपीठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी येथे आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचा उजवा हात पडला होता.
प्रभास, चंद्रभागा : हे शक्तिपीठ गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळ आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीच्या पोटाचा भाग पडला होता.
छिन्नमस्तिका : छिन्नमस्तिका शक्तिपीठ हे शक्तीशाली आणि आध्यात्मिक स्थान म्हणून ओळखले जाते. हे शक्तिपीठ हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात आहे.
दक्षायणी : मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीचा उजवा पाय पडला होता. त्यामुळे, हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. हे मंदिर बनारसमध्ये आहे.
गंडकी चंडी शक्तिपीठ: गंडकी चंडी शक्तिपीठ नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावर आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचा उजवा गाल पडला होता.
मणिबंध शक्तिपीठ: हे शक्तिपीठ पुष्कर शहरातील गायत्री डोंगरावर आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीचे मनगट पडले होते.
इंद्रक्षी/ नागपूशनी/ भुवनेश्वरी: इंद्रक्षी/ नागपूशनी/ भुवनेश्वरी हे शक्तिपीठ श्रीलंकेतील त्रिकोमाली येथे आहे.
यशोरेश्वरी / जेशोरेश्वरी: यशोरेश्वरी / जेशोरेश्वरी शक्तिपीठ हे शक्तिपीठ बांगलादेशातील सातखीरा येथील श्यामनगर उपजिल्हातील ईश्वरीपूर गावात आहे. यशोरेश्वरी शक्तीपीठ हे देवी कालीचे एक पवित्र स्थान आहे. अशी मान्यता आहे की, या ठिकाणी देवी सतीच्या पायाचे तळवे पडले होते.
तुळजाभवानी शक्तिपीठ: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी शक्तिपीठ आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते.
ब्रजेश्वरी देवी मंदिर: हे शक्तिपीठ हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा येथे आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीचे दोन्ही कान पडले होते.
नारटियांग दुर्गा मंदिर: नारटियांग दुर्गा मंदिर शक्तिपीठ मेघालयातील जैंतिया टेकडीवर आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचे पोट पडले होते. विशेष म्हणजे, येथे देवी माता सतीची जयंती म्हणून आणि भगवान शिव यांची कृमाशिश्वर म्हणून पूजा केली जाते.
युगाद्या मंदिर / क्षीरग्राम शक्तिपीठ: हे शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा उजव्या पायाचा अंगठा पडला होता.
कलमाधव / देवी काली: कलमाधव / देवी काली शक्तिपीठ येथे देवी सतीचे डावे नितंब पडले होते. हे ठिकाण मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदा नदीच्या उगमस्थानी आहे, जिथे देवी कालीच्या स्वरूपात सतीची पूजा केली जाते आणि भगवान शिवाला कालमाधव या नावाने ओळखले जाते.
कालीघाट काली मंदिर: कालीघाट काली मंदिरात देवी सतीच्या उजव्या पायाची बोटे पडली होती, अशी मान्यता आहे. हे शक्तिपीठ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरातील कालीघाट येथे आहे.
कंकालेश्वरी शक्तिपीठ: हे मंदिर पश्चिम बंगालमधील बोलपूर स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की, कंकालेश्वरी शक्तिपीठात देवी सतीच्या कंबरेचे हाड पडले होते.
विभाश / कपालिनी शक्तिपीठ: हे शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा डावा घोट्याचा भाग पडला होता, ज्यामुळे या ठिकाणी देवीला कपालिनी असे संबोधले जाते.
रत्नावली कुमारी शक्तिपीठ: रत्नावली कुमारी शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील खानाकुल येथे रत्नाकर नदीच्या काठावर आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा उजवा खांदा पडला होता.
श्री शैल - महालक्ष्मी / भैरब ग्रीबा शक्तिपीठ: हे शक्तिपीठ बांगलादेशातील सिलहटजवळ आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचा गळ्याचा भाग पडला होता.
अमरनाथ / महामाया: अमरनाथ गुहेमध्ये महामाया शक्तीपीठ आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीच्या शरीराचा कंठ पडला होता.
महिषमर्दिनी शिवहरकरय: महिषमर्दिनी शिवहरकरय शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बकरेश्वर शक्तिपीठ आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचे कपाळ आणि भुवया पडले होते.
उजनी शक्तिपीठ: उजनी शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात आहे. अशी मान्यता आहे की या ठिकाणी देवी सतीच्या उजव्या पायाची बोटे पडली होती.
नंदिकेश्वरी मंदिर शक्तिपीठ: हे शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा हार पडला होता.
सुचिंद्रम मंदिर /शुची / नारायणी: हे शक्तिपीठ तमिळनाडूमधील कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम मार्गावर आहे. अशी मान्यता आहे की, सुचिंद्रम मंदिरात, म्हणजेच नारायणी शक्तिपीठात देवी सतीचे वरचे दात पडले होते.
अट्टाहास, फुल्लरा देवी: अट्टाहास, फुल्लरा देवी शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की येथे देवी सतीचा खालचा ओठ पडला होता.
सुगंधा शक्तिपीठ: हे शक्तिपीठ बांग्लादेशातील शिखरपूर गावात आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा जिभेचा भाग पडला होता.
रकिणी / गोदावरी: रकिणी / गोदावरी शक्तिपीठ आंध्र प्रदेश राज्यातील राजमुंद्री जवळ गोदावरी नदीच्या काठी आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचा डावा हात (गाल) पडला होता.
सावित्री / भद्रकाली शक्तिपीठ: शक्तिपीठ: हे शक्तिपीठ हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की, येथे सावित्री शक्तीपीठात देवी सतीचे कपाळ पडले होते, तर भद्रकाली शक्तीपीठात सतीचे हृदय पडले होते. ही दोन्ही शक्तीपीठे अत्यंत पवित्र मानली जातात.
रामगिरी - शिवानी शक्तिपीठ: रामगिरी - शिवानी शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील चित्रकूटजवळील रामगिरी येथे आहे. अशी मान्यता आहे की, या ठिकाणी देवी सतीचा उजवा स्तन पडला होता.
श्रीपर्वत: हे शक्तिपीठ श्रीसुंदरी काश्मीरच्या लडाख प्रदेशात आहे. श्रीपर्वत शक्तिपीठात देवी सतीचा उजवा पाय पडला होता, असे मानले जाते.
त्रिपुरा सुंदरी शक्तिपीठ: हे मंदिर त्रिपुरा राज्यातील उदयपुरजवळ असलेल्या माताबारी पर्वताच्या शिखरावर आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचा उजवा पाय पडला होता.
नैनातिवू नागपूशनी अम्मान मंदिर: नैनातिवू नागपूशनी अम्मान मंदिर हे श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातील नैनातिवू नावाच्या बेटावर असलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. अशी मान्यता आहे की, येथे देवी सतीचे पैंजण पडले होते.
कात्यायनी शक्तिपीठः या शक्तिपीठाचे स्थान वृंदावन, उत्तर प्रदेश येथे आहे. मान्यतेनुसार, येथे देवी सतीचे केस किंवा चुडामणीचा भाग पडला होता.
शंकरी देवी मंदिर: शंकरा देवी मंदिर श्रीलंकेतील थिरुकोनामलाई येथे आहे. याठिकाणी देवी सतीच्या कंबरेचा भाग पडला होता, अशी मान्यता आहे.
मिथिला शक्तीपिठ: हे ठिकाण सध्या नेपाळमधील जनकपूर येथे आहे. असे मानले जाते की येथे देवी सतीचा डावा डोळा पडला होता.
बिराजा शक्तिपीठ: बिराजा शक्तिपीठ ओडिशा राज्यातील जाजपूर येथे आहे, मान्यतेनुसार, या ठिकाणी देवी सतीची नाभी पडली होती.
श्री अंबिका शक्तिपीठ: हे शक्तिपीठ राजस्थाना राज्यातील भरतपूरमध्ये आहे. येथे देवी सतीचा डावा पाय पडला होता, अशी मान्यता आहे.
माँ नर्मदा मंदिर: मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक जिल्ह्यात माँ नर्मदा मंदिर शक्तिपीठ आहे. येथे देवी सतीचा उजवा नितंब (जांघ) पडला होता, असे मानले जाते.
विमला / किरीटेश्वरी: हे शक्तिपीठ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील किरीटकोना गावाजवळ आहे. येथे देवी सतीचे वेगवेगळे भाग पडले होते, अशी मान्यता आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)