Thursday, August 21, 2025 02:55:18 AM

LATUR MNC SCAM: लातूर महानगरपालिकेच्या व्यवस्थापकाचा पगारवाढीसाठी बनावट स्वाक्षरीसह शिक्का मारून सरकारची फसवणूक

अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारात 5 टक्क्यांची वाढ करून घेण्यासाठी स्वतःच्या मूल्यांकन अहवालावर अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्का मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

latur mnc scam लातूर महानगरपालिकेच्या व्यवस्थापकाचा पगारवाढीसाठी बनावट स्वाक्षरीसह शिक्का मारून सरकारची फसवणूक

अजय घोडके. प्रतिनिधी. लातूर: लातूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागात 'शहर कार्यक्रम व्यवस्थापक' या पदावर कार्यरत असलेल्या रामेश्वर कलवले नावाच्या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारात 5 टक्क्यांची वाढ करून घेण्यासाठी स्वतःच्या मूल्यांकन अहवालावर लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि लातूर शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अमन मित्तल या दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्का मारल्याची धक्कादायक घटना विभागीय उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालात समोर आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

भारत सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत (NHM) असलेल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये 'शहर कार्यक्रम व्यवस्थापक' या पदावर कार्यरत असलेल्या रामेश्वर कलवले नावाच्या या अधिकाऱ्याने "डिसेंबर, 2020 ते नोव्हेंबर, 2021" आणि ''नोव्हेंबर, 2021 ते ऑक्टोबर, 2022'' या काळात स्वतःच्या पगारात 5 टक्क्यांची वाढ करून घेण्यासाठी मूल्यांकन अहवालावर लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि लातूर शहर महानगरपालिकेचे तत्कालीन महापालिका आयुक्त अमन मित्तल या दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्का मारून  मूल्यांकन अहवाल राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई यांच्याकडे सादर केले. याप्रकरणी, विभागीय उच्चस्तरीय समितीने केलेल्या चौकशीमध्ये रामेश्वर कलवले हा अधिकारी दोषी आढळला असून त्याने दिलेल्या लेखी जबाबात त्याने स्वतःच्या मूल्यांकन अहवालावर तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्का मारल्याचे कबूल केले.

याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये शासनाला चौकशी अहवाल पाठवला आहे. या चौकशी अहवालाला एक वर्ष उलटून गेले तरी, आरोपी अधिकारी रामेश्वर कलवले हे अजूनही लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे, लातूर महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी गेल्या एक वर्षापासून या दोषी अधिकाऱ्याला संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होते. लातूर जिल्हा प्रशासनातील दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून सरकार आणि प्रशासनाची दिशाभूल करणारे अधिकारी मुजोर रामेश्वर कलवले यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.


सम्बन्धित सामग्री