Friday, September 19, 2025 09:05:06 PM

Maharashtra ST Workers Strike: सणासुदीच्या काळात वाहतूक ठप्प होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा वाहतुकीच्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

maharashtra st workers strike सणासुदीच्या काळात वाहतूक ठप्प होणार एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Maharashtra ST Workers Strike: दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा वाहतुकीच्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर खरंच संप झाला तर गाव–खेड्यांपासून शहरापर्यंतचा संपर्क तुटण्याची परिस्थिती उद्भवू शकते.

गेल्या काही वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. आजही एसटी बस हीच प्रवासाचं प्रमुख साधन मानलं जातं. खेड्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून गृहिणींपर्यंत बहुसंख्य लोकांची रोजीरोटी ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे हा संप प्रत्यक्षात आला तर ग्रामीण महाराष्ट्राचं दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ajit Pawar NCP: मुंबई महापालिका सोडता इतर ठिकाणी स्वबळावर..., राष्ट्रवादीची मोठी घोषणा

तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात जवळपास महिनाभर एसटी कर्मचारी संपावर होते. त्या काळात प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागलं होतं. मात्र अवाजवी भाडे आकारल्यामुळे सामान्य माणसाचं बजेट बिघडलं होतं. अनेकांनी तर दिवाळीचा प्रवास रद्द केला होता. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवली तर लाखो कुटुंबांना मोठा फटका बसेल.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जुन्याच आहेत; वेतनवाढ, सेवा नियम सुधारणा, तसेच विविध प्रलंबित सुविधा लागू करणे. शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यामुळेच सेवा शक्ती संघर्ष संघटनेने आंदोलनाचं हत्यार उगारण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो लाइन-4A ट्रायल रनसाठी सज्ज; वाहतूक कोंडीची कटकट लवकर संपणार

 

या पार्श्वभूमीवर सरकारसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तत्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढला नाही, तर ऐन दिवाळीत लाखो प्रवासी अडकण्याची भीती आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचं काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण रस्त्यांवर एसटी ही फक्त बस नाही तर सामान्य माणसाचा श्वास आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून शेतकऱ्यांच्या बाजारपेठेतील पोहोचपर्यंत प्रत्येक क्षेत्र एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार आणि संघटना दोन्ही पक्षांनी सकारात्मक संवाद साधून तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा, यंदाची दिवाळी ग्रामीण जनतेसाठी अंधारमय ठरू शकते.


सम्बन्धित सामग्री