मुंबई : विधानसभेत महायुतीला जनतेने स्वीकारलं आणि भरभरून मतांचं दानही केलं. मात्र, महायुतीतील तीन पक्षात त्यानंतर सत्तासंघर्षनाट्य सुरू झालं. आधी खातेवाटपावरून वादाचा पहिला अंक रंगला तर पालकमंत्री पदावरून नाराजीची दुसरा अंक रंगला. त्यावर अद्याप पडदा पडलेला नसताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत मित्रपक्ष असलेले शिवेसना भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे यावर महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. पालकमंत्री पदाचा वाद दोन ठिकाणांना स्थगिती देण्यापर्यंत पोहोचला. ज्यावर अद्याप तोडगा निघालेला नसून दोन्ही पक्षांकडून परस्पर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तसे सूचक वक्तव्य करत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेवून वरिष्ठ पातळीवर बाजपाचे एकला चलो रे या पद्धतीनं निवडणुका होऊ शकतात.
भाजपाच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर, आम्हाला मान्य असेल, असं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हटलंय. त्यावर त्यांनी माध्यमांमध्ये स्वबळाचे नारे देण्याऐवजी पक्षाची जी काही भूमिका असेल ती आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे मांडावी असा उपरोधिक सल्लाही त्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या नेत्यांनी दिला आहे.
हेही वाचा : धस यांच्या भेटीला राजकीय संशयाचं वलय; विरोधकांकडून जोरदार निशाणा
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाच्या घोषणा केल्या असल्या तरी शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमची मुख्य भूमिका महायुती म्हणून निवडणुका लढण्याची आहे. काही लोक कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी अशा घोषणा करत असतात, मात्र महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.
महायुतीला जनतेनं स्वीकारल्याचं विधानसभेत स्पष्ट झालं आहे. सत्तेत एकत्र नांदताना निवडणुकांनाही एकत्र सामोरं जाणं महायुतीतील तिन्ही पक्षांना फायदेशीर ठरणारं आहे.मात्र पक्षाच्या 'शत प्रतिशत'या संज्ञेमुळे स्वबळाची ठिणगी काही नेत्यांकडून बाहेर पडते. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव स्थानिक समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात पक्षाचेच काही अंशी नुकसान होत असल्याचं आजवरच्या निवडणुकीतून दिसलं आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार असले तरी आता महाराष्ट्रात स्वबळाची परिस्थिती नाही हे वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.