मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला आंदोलनाची परवानगी नाकारली असतानाही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते. आता 29 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या मराठी आंदोलनाला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही परवानगी देताना काही अटी घातलेल्या आहेत.
आजपासून सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. मात्र, आता आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी घातल्या आहेत. मराठा आंदोलनाला मिळालेली परवानगी ही परवानगी 29 ऑगस्ट 2025 या फक्त एका दिवसासाठी असेल. तसेच, आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल, असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे. या अटींवर माध्यमांनी मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - Manoj Jarange Patil Big news : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार; या मुख्य अटींसह सशर्त परवानगी
परवानगी मिळाल्यानंतर जरांगे पाटील काय म्हणाले?
मराठा आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “मी लोकशाहीच्या व कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करेन. माझ्याबरोबर येणारा माझा समाज देखील सर्व नियम पाळेल. आम्ही हट्टी नाही. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं जाईल. परंतु, आम्ही केवळ एक दिवस आंदोलन करणार नाही. आम्हाला बेमुदत आंदोलन करायचं आहे. आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करत राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बाकीचे सगळे नियम मी पाळेन.”
'एका दिवसात आरक्षण द्या'
पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत आहे. मात्र, एका दिवसाची परवानगी मान्य नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मग एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो, असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला मिळालेल्या परवानगीबाबत याहून अधिक बोलण्यास सध्या नकार दिला आहे. कारण, पोलिसांनी परवानगी देताना नेमक्या काय अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत त्याबाबतचा पोलिसांचा आदेश मी वाचतो आणि त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देतो, असे ते म्हणाले. याशिवाय, आंदोलनाला मिळालेल्या परवानगीसाठी मी सरकार आणि न्यायालयाचे आभार मानतो, असेही जरांगे म्हणाले.
हेही वाचा - Mumbai-Pune Expressway Traffic: गणेशोत्सवासाठी तुफान गर्दी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम; अनेक तासांपासून चाकरमानी एकाच ठिकाणी
मुंबई पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी आणि इतर अटी
मनोज जरांगेच्या नेतृत्वाखालील मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. शनिवारी, रविवारी आंदोलनाला परवानगी नाही.
या आंदोलनामध्ये 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे.
- शनिवार, रविवार, शासकीय सुट्टीच्या दिवशी कोणतेही आंदोलन करण्यास परवानगी नाही.
- आंदोलकासोबत 5 वाहनांना परवानगी
- 5 हजार आंदोलकांना परवानगी
- 7 हजार चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा
- मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही
- ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्याला मनाई
- आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ