सांगली: मराठी भाषेच्या वापराबाबत मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी सांगलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अजूनही बँकेत मराठी भाषेचा वापर होत नाही:
'बँक ऑफ महाराष्ट्र' हे नाव असूनही बँकेत मराठी भाषेचा वापर केला जात नाही आणि मराठी भाषिक कर्मचाऱ्यांना डावलले जात आहे', असा आरोप मनसेने केला आहे. सावंत यांनी बँकेतील परप्रांतीय मॅनेजरला जाब विचारत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. बँकेत मराठी ग्राहकांशी इतर भाषांमध्ये संवाद होत असल्याने स्थानिक नागरिकांत नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेसमोर जोरदार निदर्शने:
या पार्श्वभूमीवर बँकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्याची मागणी केली. तसेच, पुढील पंधरा दिवसांत परप्रांतीय मॅनेजर व कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी स्थानिक मराठी भाषिक उमेदवारांना संधी द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सावंत यांनी दिला. तसेच, 'बँक ऑफ महाराष्ट्र' या नावाऐवजी 'परप्रांतीय बँक' असा फलक लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बँकेच्या नावामध्ये 'महाराष्ट्र' असताना, तेथे मराठी भाषेचा अपमान होणे हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी नमूद केले. मनसेने घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरली असून, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे.