छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधार गृहातून नऊ मुलींचे पलायन झाल्याचे समोर आले होता. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि त्यांनी या प्रकरणी सुमोटो दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगरातील बालसुधार गृहातून 9 मुलींचे पलायन झाल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले होते. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संभाजीनगर शहरातील छावणीतील विद्यादीप बालगृहातून पलायन करण्यापूर्वी 9 मुलींचा स्थानिक प्रशासनाकडून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची बालगृहाच्या प्रशासनासह बालकल्याण समिती आणि जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयाने दखल घेतली नसल्याची माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा: मिरा भाईंदरमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना घरातून उचलण्याला माझा विरोध; मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालसुधार गृहातून 9 मुली पलायन झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा बालसुधार गृहाकडे सोपवले. तर काहींना त्यांच्या पालकांकडे सोपावण्यात आले. पुढे हे प्रकरण अधिवेशनात गेले. मात्र या मुली बालसुधारगृहातून का पळाल्या असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. बालसुधारगृहात मुलींसोबत जे घडलं ते ऐकून संताप व्यक्त होईल. बालसुधारगृहातील मुलींचे पोट कोणत्याही कारणाने दुखत असेल तर त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जायची. मुली आजारी पडल्या की एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने त्रासलेल्या होत्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाहीत तर त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडायचे किंवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जात होता. या सर्व आरोपांचा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केला आहे.