Deenanath Mangeshkar Hospital
Edited Image
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे (Amit Gorkhe) यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे अडचणीत आलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.
या घटनेनंतर आमदार अमित गोरखे यांनी दीनानाथ मंगेशकर प्रशासनावर कारवाई करण्याचे आव्हान केले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अधिकारी व धर्मादाय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेसंदर्भात एक चौकशी समिती तयार केली आहे. या समितीला अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; सर्वस्तरातून रूग्णालयावर ताशेरे
तथापी, रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे की, सुरुवातीच्या काळात रुग्णालयात रुग्णांकडून कुठल्याही प्रकारचे डिपॉझिट घेतले जात नव्हते. परंतु उपचार घेतल्यानंतर बिल जास्त झाल्यास रुग्णांकडून ते भरण्यास नकार यायचा त्यामुळे डिपॉझिट घेण्याचा निर्णय दीनानाथ प्रशासनाकडून घेण्यात आला होता. दरम्यान तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला यापुढे डिपॉझिट न घेता प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आरोग्य सेवा देण्यात येतील, असा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश
काय आहे प्रकरण?
तनिषा भिसे या गरोदर होत्या. प्रसुतीसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्याकडून दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी करण्यात आली. तथापि त्यांच्या कुटुंबीयांनी तीन लाख रुपये जमा करतो आणि उर्वरित रक्कम नंतर भरतो, असे सांगितले होते. परंतु दीनानाथ प्रशासनाने त्यांना ऍडमिट करून न घेता ससून रुग्णालयात जाण्याबाबत सुचविले. दरम्यान महिलेला प्रसूतीचा त्रास वाढल्याने एका दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तनिषा भिसे यांनी दोन गोंडस बाळांना जन्म दिला. परंतु, यात त्यांना आपला प्राण गमवावा लागला.
यानंतर तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार मिळाले असते तर तिचा मृत्यू झाला नसता, असा दावा केला. या घटनेच्या निषेधार्थ विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मोर्चा व आंदोलन करण्यात आली.