Ashadhi Wari 2025: पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा हृदयस्पर्शी उत्सव. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे, जी अनेक शतकांपासून अखंड सुरु आहे.
वारीची सुरुवात आपल्याला थेट 13व्या शतकात घेऊन जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचे बीज रोवले आणि त्यांच्या जीवनोत्तर त्यांच्या अनुयायांनी आळंदी ते पंढरपूर ही यात्रा सुरू केली. पुढे संत तुकाराम महाराजांनी ही परंपरा अधिक व्यापक केली. त्यांच्या देहुतून निघणारी पालखी सुमारे 21 दिवसांचा प्रवास करत पंढरपूर गाठते. ही पालखी म्हणजे संतांच्या कार्याची आठवण, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि भक्तीसंपन्न जीवनाची सजीव झलक असते.
सुरुवातीला ही वारी छोट्या प्रमाणावर होत असे. मात्र 1820 साली ह.भ.प. शेख महादेव माळी यांनी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अधिकृत स्वरूप तयार केले. या आयोजनात शिस्त, वेळापत्रक, दिंड्या, मुक्काम, भोजन व्यवस्था यांचा समावेश झाला. पुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील पालखीलाही तेवढेच प्रतिष्ठेचे रूप मिळाले.
हेही वाचा: Today's Horoscope: शुभ संधी की आव्हानांचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
वारीचे विशेष आकर्षण म्हणजे 'दिंडी' छोट्या छोट्या गटांमध्ये चालणारे भक्तगण. प्रत्येक दिंडीत फड असतो, ढोल-ताशे, टाळ-मृदंग, भजन-कीर्तन आणि 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' चा अखंड गजर. वारीत जात, धर्म, लिंग यांची कोणतीही भिंत नसते. शिस्त, सहकार्य आणि सामूहिक श्रद्धेवर आधारित असलेली ही चळवळ ही भारतीय लोकशाही आणि समतेचा मूर्त आदर्श आहे.
वारी म्हणजे चालणारी विद्यापीठच. संतांची वाणी, त्यांचे अभंग, जीवनमूल्ये आणि भक्तीचा अर्थ या यात्रेदरम्यान नव्याने उमजतो. यामधून पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त, स्वच्छतेचा संदेश देणारे अनेक उपक्रमही राबवले जातात. त्यामुळे वारी हा सामाजिक परिवर्तनाचा एक सकारात्मक माध्यम ठरतो.
वारीमध्ये विज्ञान आणि श्रद्धेचा एक सुंदर समतोल दिसतो. जीपीएस, डिजिटल ट्रॅकिंग, मोबाइल हेल्थ युनिट्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर आजच्या वारीत होत असून, वारकऱ्यांची काळजी घेणारे हजारो स्वयंसेवक आणि संघटना यामध्ये सहभागी होतात.
आज वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा राहिलेली नाही, ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. जी महाराष्ट्राच्या जनमानसात खोलवर रुजलेली आहे. याचंच उदाहरण म्हणजे, आजही आधुनिक काळात हजारो तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे वारीत सामील होतात.
या सर्व पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी ही UNESCO च्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत सामील व्हावी असा प्रयत्न सुरू आहे. कारण ही परंपरा म्हणजे फक्त चालण्याचा प्रवास नाही, तर ती आहे श्रद्धेचा, प्रेमाचा आणि समतेचा अखंड सोहळा.