बीड : भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या इतके आहारी गेले होते की, त्यांच्याच घरातील लोक त्यांच्यावर नाराज असतील असा गंभीर आरोप धस यांनी केला. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षांपासून मूळ गावी नाथ्रा येथे गेल्या असून त्या अद्याप परत आलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले.
सुरेश धस यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांच्यामुळे अनेक मित्रसंबंध बिघडले. आकाच्या वागण्यामुळे धनंजय मुंडेंना कुणीच मित्र राहिले नाहीत. बजरंग सोनवणे हे त्यांचे खास मित्र होते. आम्ही पंकजाताईंना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, बजरंग सोनवणेंचा पराभव करण्यात अपयश आले नाही. जर सोनवणे हे शरद पवारांकडे गेले नसते, तर आमचा पराभव टाळता आला असता. पण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या डावपेचांमुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा : 'सुरेश अण्णा धस भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत'
धनंजय मुंडे हे पूर्णपणे वाल्मिक कराड यांच्या प्रभावाखाली होते. मुंडे जिल्ह्यात आले की संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट कराड पाहायचे. कुणाचीही भेट होऊ द्यायची नाही, सगळ्यांना बाजूला ठेवून मुंडे यांच्याशी एकट्यानेच चर्चा करायचे. त्यामुळे धनंजय मुंडेंनाही हवे ते सर्व मिळत असल्याने ते खूश होते असे धस यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंच्या घरातील सदस्यही वाल्मिक कराडवर नाराज असतील. त्यांचे चुलत भाऊ, पत्नी हेही यामुळे असमाधानी असतील. कारण कराड कुणालाही काही चालू देत नव्हता. त्यामुळे मुंडेंच्या घरगुती निर्णयावरही कराडचा प्रभाव होता. इतकेच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षांपासून मूळ गावी राहतात, त्या अद्याप परत आल्या नाहीत. त्यांच्या घराचीही दुरुस्ती झाली नाही अशी गंभीर माहिती धस यांनी दिली.