Thursday, August 21, 2025 02:53:15 AM

Panvel: शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांना ताट धुण्यास लावल्याने मुख्याध्यापिका निलंबित; शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, महापालिकेची तातडीने कारवाई.

 panvel शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्र. 6 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक आणि समाजातून संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकारामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सुदाम हिलम यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी 'अक्षयपात्र' या संस्थेची निवड शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांकडून ताट धुण्याचे काम करून घेतले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित आया बदलण्याचे आदेशही अक्षयपात्र संस्थेला देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेचे आयुक्त यांनी यावर कडक भूमिका घेत, बालकांचे अधिकार आणि त्यांच्या शैक्षणिक वातावरणाशी संबंधित बाबतीत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व शाळांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि शाळेतील व्यवस्थापनाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा प्रकार समोर येणं ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी स्वच्छतेचे धडे दिले जातात; मात्र त्यांच्याकडून असं श्रम करून घेणं हा अन्यायकारक प्रकार आहे. 


सम्बन्धित सामग्री