Nilaje Bridge Water Pipeline Burst: शुक्रवारी सकाळी बारवी धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी निळजे रेल्वे ओव्हरब्रीजजवळ अचानक फुटली. यामुळे पाणी सुमारे 60 फूट उंच हवेत उडाले. तसेच शेकडो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे नवी मुंबईतील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे शहराच्या वितरण नेटवर्कवर परिणाम होऊ शकतो.
शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे ओव्हरब्रीजच्या पूर्वेकडील बाजूस, एका रखडलेल्या बांधकाम स्थळाशेजारी ही पाईपलाईन फुटली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आकाशात कारंज्यांसारखा वर्षाव होत असल्याचे दृश्य घटनास्थळी दिसत होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे आसपासच्या बांधकाम कामगारांमध्ये गोंधळ उडाला. तसेच घाबरलेले कामगार धावत आश्रय शोधताना दिसले, तर काही स्थानिक रहिवासी व रस्त्यावरून जाणारे लोक या अद्भुत पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घेत होते. अनेक वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रसंग कैद केला. या संपूर्ण घटनेमुळे शिळफाटा रस्त्यावर तात्पुरती वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा - Manoj Jarange VS Laxman Hake: हाकेंची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस; जरांगेंवरील बेताल वक्तव्यामुळे मराठा समन्वयक संतापले
निळजे पुलाजवळ जलवाहिनी फुटली, पहा व्हिडिओ -
प्रशासनाची तातडीची कारवाई -
फुटलेली पाईपलाईन एमआयडीसीच्या महापे विभागाअंतर्गत येते. तथापी, या घटनेची माहिती मिळताच महापे येथून अभियंते व दुरुस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिक पाणी वाया जाऊ नये म्हणून जांभूळ शुद्धीकरण प्रकल्पातून बारवी धरणाचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाईपलाईनमधील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम सुरू करता येईल.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप
बारवी धरणातून कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंब्रा, कळवा आणि नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत या पाईपलाईनमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. गेल्या दोन वर्षांत काटे-बदलापूर रोड, काटे-नवी मुंबई मार्ग आणि ठाणे रोड परिसरात किमान सात ते आठ वेळा अशाच प्रकारे जलवाहिनी फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत.