पुणे: नुकताच, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट करण्यात आला असून हा सरकार पुरस्कृतच होता', असं प्रवीण गायकवाड म्हणाले. 'दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गॉड फादर मानत असल्याने तेच खरे मास्टरमाईंड आहेत. याबाबत, सरकारने गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जसास तसे उत्तर देण्यात येईल', असा इशारा देखील प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
काय म्हणाले प्रवीण गायकवाड?
'ज्यांनी माझ्यावर हल्ला केले, त्यातील काही आरोपी बाहेरच्या राज्यातील होते. इतकच नाही, तर त्यापैकी काहीजण पॅरोलवर बाहेर असणारे लोक होते. यासोबतच त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. माझ्यावरील त्यांचा हल्ला ही त्यांची निषेधात्मक कारवाई नसून पूर्वनियोजित कट होता. अक्कलकोट पोलिसांनी संबंधित हल्लेखोरांवर साधारण अदखलपात्र गुन्हे नोंदवले', असं प्रवीण गायकवाड म्हणाले.
पुढे, गायकवाड म्हणाले की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही नैतिक जबाबदारी असून त्यांनी ती स्वीकारावी. तसेच, त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, आणि जो यामागील खरा मास्टरमाईंड आहे त्याच्यावर सरकारने कारवाई करावी. सरकार पुरस्कृत या हल्ल्याचा मी निषेध नाही करणार. मात्र, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जसास तसे उत्तर निश्चितच देण्यात येईल. लोकशाहीविरोधी विचारांच्या शेवटची सुरुवात आहे'.
'माझ्यावर हल्ला केलेला दीपक काटेवर चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप असून याची शिक्षा त्याने भोगली आहे. त्यासोबतच, २ पिस्तूल आणि 28 काडतुसंसह पकडला गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला गांभीर्याने न घेता, न्यायालयात खोटी माहिती दिली आणि त्याला जामिनावर सोडण्यात आले', असं देखील यादरम्यान प्रवीण गायकवाड म्हणाले. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकंगे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शाम कदम, सोमेश्वर अहिरे, रेखा कोंडे, प्रशांत कुंजीर यांच्यासोबत इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.