मुंबई: मराठी-हिंदी भाषेवरून सध्या महाराष्ट्राचं वातावरण प्रचंड तापलं आहे. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मीरा रोड-भाईंदर दौऱ्यावर असतील. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्याबद्दल एका दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली होती. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त बैठकीपूर्वी घडलेल्या या घटनेने मराठी भाषेच्या लढ्याला आणखी तीव्र केले होते. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख केला आणि मनसैनिकांना विशेष सूचना दिल्या.
हेही वाचा: मध्यरात्री विधानभवनाबाहेर शरद पवार गटाचं ठिय्या आंदोलन
'या' दौऱ्यात काय होणार?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान, राज ठाकरे मनसेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करतील. सोबतच, ते मीरा भाईंदर येथील मनसेच्या सर्वांत पहिल्या शाखेलाही भेट देतील. माहितीनुसार, नव्या शाखेच्या उद्घाटनानंतर या शाखेबाहेरून राज ठाकरे मनसैनिकांसमोर भाषण करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, सायंकाळी राज ठाकरे येण्यापूर्वी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे आधीच मीरा रोडला पोहोचतील.

मराठी-हिंदी वादावरून 8 जुलै रोजी मीरा रोड येथे पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारणाने मनसेचे नेते अधिक आक्रमक झाले होते. 'काहीही झाले तरी ही मोर्चा निघणारच', अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी घेतली होती. या मोर्चापूर्वी, मीरा भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. 'त्यांना परवानगी मिळते, पण दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी माणसाने काढलेल्या मोर्चाला परवानगी मिळत नाही', असा संताप मनसे नेत्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मनसेच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतकच नाही, तर या मोर्चासाठी मनसैनिकांना उद्धव ठाकरे गटाची साथ मिळाली होती.