वर्धा: मंदिरात रामदास तडस यांना झालेल्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत डॉ. प्रसन्न पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, 'मंदिर हे केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे केंद्र आहे आणि तिथे कोणालाही अपमानित करणे म्हणजे हिंदू धर्माच्या मूळ तत्वांना विरोध करणे होय'.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
'काय बा करिशी सोवळे ओवळे.
मन नाही निर्मळ वाऊगेचि.'
या ओळींतून डॉ. पाटीलांनी हे स्पष्ट केले की, 'धार्मिक शुद्धता ही फक्त बाह्य कृतींमध्ये नसून मनाच्या निर्मळतेमध्ये असते. मंदिर म्हणजे केवळ "मंदर - मन के अंदर" प्रवेश आहे', अशी त्यांची भावना आहे.
मंदिरं केवळ पूजेसाठी नव्हती:
पुढे डॉ. पाटील म्हणाले, 'इतिहासात मंदिरं ही केवळ पूजेसाठी नव्हती, तर ती समाज संघटन, विचारमंथन, आणि एकत्र येण्याची केंद्र होती. आक्रमकांनीही याच कारणामुळे प्रथम मंदिरांवर हल्ला केला. मंदिर हे एक शक्तीकेंद्र असल्याचे त्यांना माहीत होते. दुर्दैवाने, आज हे मंदिरं केवळ कर्मकांडापुरती मर्यादित राहिली आहेत. सोवळं-ओवळं यासारख्या बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते. धर्माचा मूळ हेतू, सर्वांना लौकिक आणि पारलौकिक उन्नतीचा मार्ग दाखवणे यासारख्या गोष्टी हरवत चालला आहे.
संत ज्ञानेश्वर यांनी हा संदेश वेळोवेळी दिला:
'अशा प्रकारांच्या निषेधाची गरज आहे. जानवं, विभूती, जटा हे धर्माचे खरे प्रतीक नाहीत तर श्रद्धा आणि समर्पण हेच मर्म आहेत. संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, आणि ज्ञानेश्वर यांनी देखील हा संदेश वेळोवेळी दिला आहे', असे डॉ. पाटील म्हणाले. 'त्यांनी मंदिर प्रशासनाने रामदास तडस यांची माफी मागून त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करावे. सोबतच, त्यांच्या हस्ते विशेष पूजा आयोजित करून संपूर्ण गावाने त्यात सहभागी व्हावे', असे ते म्हणाले. ताज्या घडामोडीनुसार, मंदिर समितीच्या अध्यक्षांनी खुलासा दिला असून, त्यांनीही ही बाब समाजात चुकीचा संदेश देईल याची कबुली दिली आहे.
शेवटी, डॉ. पाटील यांनी स्पष्ट इशारा देत म्हणाले, 'रामभक्त तडस यांना उपदेश देण्याआधी तथाकथित पुरोगाम्यांनी स्वतःचा आरसा पाहावा. मंदिर ही केवळ श्रद्धेची जागा नसून ती सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि सामाजिक एकतेचं प्रतीक असावी, हाच खरा हिंदू धर्माचा संदेश आहे'.