Thursday, August 21, 2025 02:29:39 AM

'औरंगजेबाची कबर हटवा' मालेगावातील बजरंग दल आक्रमक भूमिकेत

तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 पासून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे.

औरंगजेबाची कबर हटवा मालेगावातील बजरंग दल आक्रमक भूमिकेत

नुकताच, 14 फेब्रुवारी 2025 रोजी 'छावा' चित्रपट रिलीज झाला होता. अवघ्या 3 दिवसातच, 'छावा' चित्रपटाने 48.5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटात दाखवलेल्या सीनमध्ये ज्याप्रकारे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष छळ केला आहे, त्यामुळे सर्वत्र औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची चर्चा होत आहेत. काही दिवसांपूर्वी, 'छावा' या चित्रपटाला अनुसरून अनेक राजकीय नेत्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या अमानुष छळावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
                    मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. 'औरंगजेबाची कबर ठेवण्याची गरजच काय? औरंगजेबाची कबर उखडून टाका', असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. अबू आझमींनी केलेल्या औरंगजेबाच्या स्तुतीमुळे त्यांना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित केले गेले. अशातच, औरंगजेबच्या कबरीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. 'प्रत्येकाला असच वाटतं की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात', असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
         

 शिवजयंती दिनी बजरंग दलाने केला निश्चय:

'छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा', हा निश्चय, बजरंग दलाने शिवजयंती दिनी घेतले आहे. 'औरंगजेबाची कबर न हटवल्यास ‘बाबरी’ची पुनरावृत्ती करू', असा इशारादेखील देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, खुलताबाद येथील कबर परिसरात पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


पुण्यातील संयुक्त पत्रपरिषदेत बजरंग दलाचे प्रांत म्हणाले:

पुण्यात झालेल्या संयुक्त पत्रपरिषदेत हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे यांनी सांगितले की, 'औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी व अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी; अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, मोर्चे काढेल आणि गरज पडल्यास चक्काजाम आणि कारसेवा करून औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करणार'. 


राज्यभरात आंदोलन:

तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 पासून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. 


मालेगावातील बजरंग दल आक्रमक:

'ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून मारले, हिंदूचे देवदेवतांची मंदिरे तोडली, हिंदू महिलांवर अत्याचार करत अनन्वित छळ केला अशा क्रूरकर्मा औरंगजेबची कबर महाराष्ट्र सरकारने तातडीने हटवावी', अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जयघोष करत, 'औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी', अशी घोषणा देखील मालेगावातील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने केले. 
 


सम्बन्धित सामग्री