Sunday, August 31, 2025 04:43:15 AM

सभागृहात कोकाटे 18 मिनिटे रमी खेळत होते; रोहित पवारांचा दावा

बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'माणिकराव कोकाटे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते'.

सभागृहात कोकाटे 18 मिनिटे रमी खेळत होते रोहित पवारांचा दावा

मुंबई: माणिकराव कोकाटे 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी कोकाटेंवर टीका केली. अशातच, माणिकराव कोकाटे रमी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'माणिकराव कोकाटे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते'. यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

रोहित पवारांचा दावा

बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते_खेळणारा_मंत्री'. 

नेमकं प्रकरण काय?

20 जुलै रोजी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर विधानसभेच्या सभागृहात 'जंगली रमी' खेळत होते. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. 'जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी', असा टोला रोहित पवारांनी लगावला.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या'.

'रमी'वर स्पष्टीकरण देत कोकाटे म्हणाले... 

'सभागृहात अनेक कॅमेरे सुरू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा मुद्दाच येत नाही. मी स्किप करण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं की लगेच कसं स्किप करतात? पण स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलाच नाही. एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मग तुमच्या लक्षात येईल की मी स्किप केलं की नाही? कोणी व्हिडिओ शूट केला याबद्दल काहीच हरकत नाही. मात्र, माझ्या खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे? ते बघण्यासाठी मी मोबाईलवर युट्युब बघत होतो. त्यावर डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, स्किप करताना तिथे कोणीतरी माझा व्हिडिओ काढला असावा', असं कृषिमंत्री कोकाटे म्हणाले. 

रोहित पवारांवर टीका करत कोकाटे म्हणाले की, 'आतापर्यंत माझ्या संदर्भात रोहित पवारांचे काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत नाही. हे रिकामे उद्योग कसे दिसतात? उगीचच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाही'. 


सम्बन्धित सामग्री