कवठेमहांकाळ, सांगली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' या सिनेमात बनावट आयकर अधिकारी बनून श्रीमंतांना लुटल्याचे दृश्य पाहून आपण थक्क झालो होतो. पण आता अशीच एक थरारक घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये घडली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात तोतया आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल 2 कोटी रुपयांचा ऐवज लुटला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
'सर्च वॉरंट' दाखवले आणि दरोडा टाकला
कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. त्यांनी स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. 'आम्ही तुमच्या घराती झडती घ्यायला आलोय,' असे सांगत त्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना एक 'सर्च वॉरंट' दाखवले आणि संपूर्ण घराची झडती सुरू केली.
सिनेमात दाखवल्याप्रमाणेच या तोतया अधिकाऱ्यांनी अत्यंत सफाईने आपले काम केले. त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा तपासला आणि मोठ्या शिताफीने रोकड आणि दागिने शोधले.
हेही वाचा - Satara News : अबब! एक नव्हे दोन नव्हे तब्बल 4 बाळांना जन्म; हे दाम्पत्य झाले सात बाळांचे पालक
2 कोटींचा ऐवज घेऊन पसार
या दरोडेखोरांनी घरातून सुमारे 16 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 कोटी रुपयांचा ऐवज स्वतःच्या ताब्यात घेत तो जप्त करत असल्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी तिथून पोबारा केला. मात्र, कारवाई सुरू असताना डॉक्टर म्हेत्रे यांना काहीसा संशय आला.
पोलिसांचा तपास सुरू
आरोपी पळून गेल्यानंतर डॉक्टर म्हेत्रे यांचा संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हा छापा पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. आपल्यासोबत झालेली फसवणूक कळल्यावर डॉक्टरांना मोठा धक्का बसला. पोलीस या 'स्पेशल 26' स्टाईल दरोड्याचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा - Pune Accident : पुण्यात नेत्याच्या वाढदिवस मिरवणुकीत DJ च्या वाहनाने अनेकांना चिरडले; 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू