गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या अश्लील वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या परिसरात विद्यार्थी उपस्थित असतानाच हे दोघे अश्लील चाळे करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, हे गैरवर्तन अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली आणि सत्य बाहेर आलं.मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या या वर्तणुकीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षकांवर विश्वास ठेवून मुलं शिक्षणासाठी येतात, मात्र अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: उष्णतेचा तडाखा: सोयगावमध्ये उष्माघाताने पहिला बळी
ग्रामस्थ आणि पालकांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारांमुळे शाळेची प्रतिष्ठा मलीन झाली असून, लहान मुलांवर वाईट संस्कार होत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.या प्रकरणी पुढील चौकशीसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षण विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर तातडीने कठोर पावले उचलली जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.