Navy Security Breach: मुंबईतील नेव्ही नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय नौदलाच्या निवासी भागातून एका ज्युनियर खलाशाची इन्सास रायफल आणि 40 जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. संशयित आरोपीने स्वतःला नौदलाचा जवान म्हणून सादर करून फसवणूक केली आणि तो शस्त्रांसह फरार झाला. ही घटना 6 सप्टेंबरच्या रात्री उघडकीस आली असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नेमक काय आहे प्रकरण?
शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती नौदलाचा गणवेश घालून नेव्ही नगर परिसरात शिरला. तो ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ खलाशाजवळ गेला आणि पुढील शिफ्टसाठी स्वतःची नेमणूक झाल्याचे सांगितले. खलाशाने त्याच्यावर विश्वास ठेवत सर्व्हिस रायफल, दोन मॅगझिन आणि 40 जिवंत काडतुसे त्याच्याकडे सोपवली. मात्र, थोड्याच वेळात तो व्यक्ती तेथून गायब झाला.
हेही वाचा - Lalbaugcha Raja Visarjan 2025: राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा डल्ला; भामट्यांनी 100 हून अधिक मोबाईल, सोनसाखळ्या चोरल्या
तात्काळ शोधमोहीम
घटना लक्षात येताच नौदलाने आणि मुंबई पोलिसांनी परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. तरीही संशयिताचा माग काढण्यात अद्याप यश आलेले नाही. या गंभीर सुरक्षाभंगाच्या घटनेनंतर चौकशी मंडळ स्थापन करण्यात आले असून, एनआयए, एटीएससह अनेक सुरक्षा यंत्रणा तपासात सहभागी झाल्या आहेत.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही कारवाई नियोजनबद्ध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नौदलाने हरवलेली रायफल आणि दारुगोळा परत मिळवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा - Ayush Komkar: सुडाच्या भावनेतून आयुषला संपवलं, मामा वनराज आंदेकरचा खून कसा झाला?
सुरक्षा यंत्रणा सतर्क
नौदलाच्या निवासी भागासारख्या संवेदनशील क्षेत्रात घुसखोरी होऊन शस्त्र चोरीला जाणे ही अतिशय चिंताजनक बाब मानली जात आहे. बाहेरील व्यक्तींना या परिसरात प्रवेश मनाई असूनही आरोपी आत कसा शिरला, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर मुंबईतील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.