Thursday, August 21, 2025 12:08:48 AM

पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात; संत्रा बागेचं अतोनात नुकसान

नुकताच बीड येथील आष्टी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. हातात तोंडाशी आलेला घास अक्षरशः मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात संत्रा बागेचं अतोनात नुकसान

आमिर हुसेन, प्रतिनिधी, बीड: नुकताच बीड येथील आष्टी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. हातात तोंडाशी आलेला घास अक्षरशः मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लालाबाई जयराम धोंडे यांनी त्यांच्या एका एकर शेतीत दोन हजार टोमॅटोची लागवड केली होती. भर उन्हाळ्यात ठिबक पद्धतीने पाणी देऊन बाग फुलवली होती. हातात तोंडाशी आलेले फळ तोडून दोन रुपये कमवण्याची त्यांना आशा होती. पण अवकाळी पावसाने लालाबाई यांच्या लाल टोमॅटोचा अक्षरशः नासाडी केली आहे. 'सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी', अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

संत्रा बागेचं अतोनात नुकसान:

बीडमधील आष्टी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धामणगाव येथील राहुल चौधरी यांच्या संत्र्याची झाडे उन्मळून पडली आहेत. पाच वर्षांपूर्वी दोन लाख रुपये खर्च करून राहुल चौधरी यांनी संत्र्याची बाग उभारली होती. पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारले असता, अधिकारी म्हणतात की, 'आम्ही फळांचे पंचनामे करू शकत नाही.' तसेच अवकाळी पावसामुळे राहुल बाबासाहेब चौधरी यांच्या दीड एकर संत्र्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे आणि संत्र्याच्या बागेतील सर्व माती वाहून गेली आहे. इतकंच नाही, तर संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यामुळे जवळपास 150 झाडांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही सरकारने अद्याप बागांची तपासणी न केल्यामुळे शेतकरी निराश आहेत. तसेच, 'मायबाप सरकारने फळबागांची पंचनामे करावीत,' अशी मागणी शेतकरी राहुल चौधरी यांनी सरकारकडे केली आहे.

 


सम्बन्धित सामग्री