बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणी आज झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीत सरकारी वकिलांनी खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम मांडला आहे. तर कागदपत्रं न मिळाल्यानं आरोपांची निश्चिती करु नका असे आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यामुळे आरोप निश्चिती न करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली आहे.
उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद
बीड न्यायालयात आज देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. देशमुख हत्या प्रकरणात देशमुखांची बाजू उज्ज्वल निकम कोर्टात बाजू मांडत आहेत. निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला. उज्ज्वल निकम म्हणाले, कराडच्या आवाजाचे नमुने तपासले. कराडनं जगमित्र कारखानाच्या कार्यालयात खंडणी मागितली. यासंदर्भात विष्णू चाटेच्या कार्यालयात 29 नोव्हेंबरला बैठक झाली. बैठकीला सर्व आरोपी उपस्थित होते. 8 डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये चाटे, घुले यांची बैठक झाली आणि 29 नोव्हेंबरला खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं असा युक्तिवाद निकम यांनी केला.
हेही वाचा : पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर झाली. देशमुख प्रकरणातील आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकील पत्र न्यायालयासमोर मांडले. 12 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात मागितले होते. चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट आरोपीच्या वकिलांना देण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांना जवळ जवळ सहाशे पाने कागदपत्रे देण्यात आली. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.