Vaishnavi Hagvane Suicide Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता वैष्णवीच्या लग्नात तयार करण्यात आलेल्या रुखवतावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या रुखवतासाठी कस्पटे कुटुंबाकडून तब्बल 1 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याचे समोर आले असून, विशेष म्हणजे हा रुखवत आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पुनम सुपेकर यांनी तयार केला होता, असा दावा करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण रुखवताची जबाबदारी सुपेकर यांच्या पत्नीने घेतली होती. वैष्णवीच्या सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा यांनी रुखवत स्वतः बनवू नका, आमच्या नातेवाईकांकडून म्हणजेच सुपेकर कुटुंबाकडूनच बनवा, असे सूचित केल्यानेच कस्पटे कुटुंबाने हा निर्णय घेतला होता.
पेमेंटविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रुखवतासाठी 1 लाख रुपयांचा चेक आणि 50 हजार रुपये रोख रक्कम सुपेकर यांच्या पत्नीला दिली गेली. हे पैसे वैष्णवीच्या आईच्या बँक खात्यातून ट्रान्सफर करण्यात आले होते.
हेही वाचा: अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीची पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन निर्घृण हत्या; पतीसह पाच जणांना अटक
या नव्या खुलाश्यामुळे आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हगवणे कुटुंबाशी त्यांचे संबंध असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर मिळाला आहे. याआधीही शशांक आणि सुशील हगवणे यांना अवघ्या सव्वा महिन्यात शस्त्र परवाना मिळाल्याने सुपेकर यांच्या हस्तक्षेपाची शंका उपस्थित झाली होती.
रुखवताच्या व्यवहारातून आर्थिक देवाणघेवाणीचा मुद्दा समोर आला असून, आत्महत्या प्रकरणात आता एक नवं वळण मिळालं आहे. सुपेकर कुटुंबाच्या सहभागामुळे हे प्रकरण केवळ कौटुंबिक नव्हे, तर प्रशासनिक पातळीवरही गांभीर्याने पाहिले जात आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक ठरत असून, वैष्णवीच्या आत्महत्येमागील खऱ्या कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने हा नवा धागा महत्त्वाचा ठरू शकतो.