बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला तीन महिने उलटून गेले असले तरी आंधळे पोलिसांच्या हातात सापडलेला नाही. बुधवारी (दि. 13) नाशिकमधील सहदेवनगर परिसरात कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला परंतु तो कृष्ण आंधळे असल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना सापडलेला नाही.
काय आहे प्रकरण?
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. बुधवारी नाशिकमधील गंगापूर रोडवरील सहदेवनगर भागात आंधळे दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, मात्र आंधळे असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा हाती लागलेला नाही.
हेही वाचा: स्वारगेट प्रकरणात नवा वाद, आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे खळबळ!
‘तो’ खरोखर कृष्णा आंधळे होता का?
स्थानिकांनी कृष्णा आंधळे मोटारसायकलवरून मखमलाबादच्या दिशेने जात असल्याचे पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणांचे चेहरे स्पष्ट नसल्यामुळे तो खरोखर कृष्णा आंधळे होता का, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
प्रत्यक्षदर्शी वकील गीतेश बनकर यांनी सांगितले की, 'सकाळी मी घरातून बाहेर पडलो, तेव्हा दत्त मंदिराजवळ दोन तरुण दिसले. ते मास्क घालत होते. त्यातील एकाने मास्क खाली घेतल्यावर मी त्याला ओळखले. तो कृष्णा आंधळेच होता. मी लगेच गंगापूर पोलीस ठाण्यात कळवले. तो मखमलाबादच्या दिशेने मोटारसायकलवरून गेला.'
नाशिक पोलिसांनी आतापर्यंत अनेक भागांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संबंधित तरुण कृष्णा आंधळे असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा मिळालेला नाही. तरीही पोलिसांनी संशयित भागात शोधमोहीम सुरूच ठेवली आहे.