जयराज राजिवड. प्रतिनिधी. वसई-विरार: वसई-विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्लॅबचा प्लास्टर डोक्यावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना विरार पूर्व येथील गोपचरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. या मृत महिलेचे नाव लक्ष्मी सिंग आहे. सुदैवाने, मृत लक्ष्मी सिंग यांची दोन्ही मुले थोडक्यात बचावली आहेत. या घटनेची माहिती मिळताच, विरार पोलीस, वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिलसन गोन्साल्विस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली
काय म्हणाले सहाय्यक आयुक्त?
या घटनेवर सहाय्यक आयुक्त गिलसन गोन्साल्विस म्हणाले की, 'विरार पूर्वेकडील गोपचरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंटमधील 335 रूम नंबर येथे स्लॅबचा प्लास्टर कोसळला आहे. या घटनेत एका महिलेच्या डोक्यावर स्लॅबचा प्लास्टर कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. धोकादायक इमारतींवर आमची कारवाई चालू आहे. आमचं नोटीस वाटप चालू आहे. तसेच, या पूजा अपार्टमेंटलाही आजच नोटीस दिली जाईल. नागरिकांनादेखील हेच आव्हान आहे की, आम्ही तुम्हाला जे नोटीस देतो इमारत खाली करण्यासाठी, तर तुम्ही आम्हाला सहकार्य करून लगेच खाली करून द्यायला पाहिजे, ज्यामुळे पुन्हा अशी घटना घडणार नाही'.