Worli Accident: मुंबईमधून अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी सकाळी वरळीमध्ये बंदोबस्त ड्युटीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने धडक दिली. या दुर्दैवी अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली. सकाळी सुमारे 7:45 वाजता वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोड कनेक्टरजवळ ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, कॉन्स्टेबल दत्तात्रय कुंभार (52) आणि महिला कॉन्स्टेबल रिद्धी पाटील हे बंदोबस्त ड्युटीवर होते. त्याच वेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडई ग्रँड आय10 कारचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली. धडकेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा - Kolhapur Gokul Sabha : गोकुळ दूध महासंघाने घेतला महत्त्वाचा निर्णय; लवकरच होणार 'या' नवीन उत्पादनांची बाजारपेठेत एंट्री
अपघातानंतर तातडीने दोघांनाही वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कॉन्स्टेबल कुंभार यांचा मृत्यू झाला. महिला कॉन्स्टेबल पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, कार चालकाची ओळख रामचंद्र राणे (46) अशी पटली आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकाऱ्यांनी चालकाची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार असल्याचे पुष्टी केली आहे.
हेही वाचा - Navy Security Breach: नौदलाच्या जवानाची रायफल आणि 40 काडतुसे घेऊन संशयित फरार; सुरक्षा यंत्रणा सतर्क
या अपघातामुळे पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त होत असून, बंदोबस्त ड्युटीदरम्यान सुरक्षा उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृत कॉन्स्टेबल दत्तात्रय कुंभार आणि जखमी रिद्धी पाटील हे दोघेही वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.