डोंबिवली : हल्ली तरुणांचे ऑनलाईन गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. या खेळापायी मोठमोठी कर्जेही घेतली जातात. मात्र, असे गेम्स मोठ्या काळासाठी खेळत राहिल्यास ते व्यसन बनतात. जुगारासारखे असलेले हे गेम्स एक प्रकारचा सापळा असतात. यांच्या आहारी गेलेल्या अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या ऑनलाईन गेम्सचे मार्केट इतके वाढले आहे की, मोठमोठे क्रिकेट आणि बॉलीवूड स्टार्स, सेलिब्रिटीज या गेम्सची जाहिरात करताना दिसतात. हे लोक अनेक तरुणांचे आणि सर्वसामान्यांचे आयडॉल असल्यामुळे चुकीच्या समजुती तयार होऊन अशा गोष्टींकडे वळण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे.
डोंबिवलीत ऑनलाईन गेमच्या सापळ्यात अडकल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. डोंबिवलीत एका तरूणाला ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होत. हे गेम खेळण्यासाठी त्याने विविध ॲप्सच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज वित्तीय संस्थांनी दिलेल्या वेळेत हा तरूण फेडू शकत नव्हता. यामुळे निराश झालेल्या या तरूणाने राहत्या घरात आत्महत्या केली.
हेही वाचा - वाढदिवसा दिवशी संपवले आयुष्य… 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या
मोहित त्रिवेंद्र पुन्दीर (30) असे या तरूणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेत देसलेपाडा भागात राहत असलेल्या या तरुणाला ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होते. या मृत्युप्रकरणाची मुंब्रा येथे राहणाऱ्या फैजान शेख या तरुणाने मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीप्रमाणे मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घेतली आहे. गुरूवारी सकाळी मोहीत पुन्दीर याने ॲल्युमिनिअम फॉस्फाराईड हे घातक रसायन प्यायले असल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की मोहित पुन्दीरला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. जुगार, सट्टेबाजीसारखे हे गेम खेळण्यासाठी त्याला वारंवार पैसे लागत होते. हे गेम खेळण्यासाठी मोहितने विविध ॲप्सच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. अनेक संस्थांकडून घेतलेले कर्ज मोहित विहित वेळेत फेडू शकत नव्हता. देणेकरी संस्था मात्र मोहितच्या मागे कर्ज फेड करण्यासाठी तगादा लावून होता. आपण वेळेत कर्ज फेडू शकत नाहीत. एवढी रक्कम आपण उभी करायची कशी, यामुळे तो बेचैन झालेला होता.
हेही वाचा - धक्कादायक! बदलापूरमध्ये भटका कुत्र्याचा 9 वर्षांच्या मुलीवर हल्ला, रेबीजमुळे गमवला जीव
या कर्जबाजारीपणामुळे चिंतेत असलेल्या मोहितने गुरुवारी सकाळी देसलेपाडा येथील राहत्या घरात घातक रसायन प्राशन केले. त्याला तात्काळ उलट्या आणि इतर त्रास सुरू झाले. त्याला परिचितांनी एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी सकाळी साडेसहा वाजता दाखल केले. डॉक्टरांनी मोहितला धोक्याच्या बाहेर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शेवटी मोहितची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देईनाशी झाली आणि दुपारी त्याचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेतली आहे. याप्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पाऊलबुध्दे करत आहेत.