मुंबई : मुंबईकराची चिंता वाढणार आहे. कारण पुण्यानंतर आता मुंबईत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चा पहिला रुग्ण सापडला आहे. मुंबईत अंधेरी पूर्व भागातील मालपा डोंगरी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा जीबीएस चाचणी पॉझिटिव्ही आली असून त्या रूग्णाला उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. सध्या राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 वर पोहोचली. तर जीबीएसच्या रुग्णांच्या मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ६२ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्याही १७३ वर पोहोचली आहे. पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयात ६३ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला.
हेही वाचा : वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडलं
जीबीएस म्हणजे काय?
जीबीएस म्हणजे गुइलेन बॅरी सिंड्रोम होय. हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारणपणे 78 हजार लोकांपैकी एकाला हा जीबीएस आजार होतो. याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण बऱ्याच प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणूच्या किंवा बॅक्टेरियाच्या इंफेक्शननंतर जीबीएस होत असल्याचे समोर आले. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला केला जातो.
जीबीएसममध्ये काय होतं?
गुइलेन बॅरे सिंड्रोममध्ये काय होतं, तर एरवी परकीय विषाणू वा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत. आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो. थकवा, हातापायाला मुंग्या येणं - झिणझिण्या येणं हे याचं लक्षण असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं हात - चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते.यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाता- पायांतलं त्राण जातं वा संवेदना जातात, श्वास घ्यायला गिळायला त्रास होतो. कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये (Adults) आणि त्यातही पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलंय. काही रुग्णांमध्ये गीयन बारे सिंड्रोम अतिशय गंभीर होऊ त्यातून पॅरालिसीस वा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पण अगदी गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्णही यातून पूर्ण बरे झाले आहेत.