मुंबई : मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठी समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्य नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून मनोज जरांगेंनी पहिल्या दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान, राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक शहरभर पसरले असून त्यामुळे मुंबईकरांना दैनंदिन आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, काल मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांनी फक्त आझाद मैदानात आंदोलन करावे, शहर मोकळे करावे, असे आदेश दिले. तर आज मुंबई पोलिसांनी आझाद मैदानदेखील रिकामे करावे, अशी नोटीस मनोज जरांगेंना दिली. त्यानंतर मनोज जरांगेंनी आज आंदोलकांशी साधलेल्या संवादात मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असे आवाहन केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, असा इशारा सरकारला दिला.