मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील बहुप्रतीक्षित डी.एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या पहिल्या टप्प्यातील मार्ग मोकळा झाला आहे. तर आज 10 सप्टेंबरपासून या मार्गावर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) पथकाकडून तपासणी सुरु केली जाणार असल्याची माहिती आहे. कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टीने सुरक्षा प्रमाणपत्र देताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रवासाचा मुंबईकरांना लाभ घेता येणार आहे.
बहुप्रतिक्षित डी.एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेची लांबी 23.6 किमी इतकी आहे. ज्यामध्ये एकूण 19 स्थानके आहेत. तर पहिल्या टप्प्यातील 5.3 किमी मार्गाची लांबी आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रो मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन या स्थानकांवर धावणार आहे. दरम्यान या मार्गिकेसाठी सुमारे 10 हजार 986 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा: Worli Accident: वरळीत बंदोबस्त ड्युटीदरम्यान भरधाव कारची धडक; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, महिला कॉन्स्टेबल जखमी
एमएमआरडीएच्या याआधीच्या नियोजनानुसार 'मेट्रो 2 बी'चे काम ऑक्टोबर 2022 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदारांनी काम न केल्याने एमएमआरडीएला तीन पॅकेजमधील कंत्राटदार बदलावे लागले होते. यातील दोन पॅकेजमधील कंत्राटदारांची 2021 मध्ये नियुक्ती केली होती. परिणामी मेट्रोला तीन वर्षांचा विलंब लागला. पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि मेट्रो लवकरच सेवेत दाखल होणार आहे.