मुंबई: मुंबईत मानवी बॉम्ब आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी देशात घुसण्याचा धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात जलदगतीने कारवाई करत 24 तासांच्या आत नोएडा येथून त्याला अटक केली. व्यवसायाने ज्योतिषी आणि मूळ बिहारमधील पाटणा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी कुमारला अटक केली आहे. त्याने शहराला अनेक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता.
अश्विनी कुमार गेल्या पाच वर्षांपासून नोएडाच्या सेक्टर 79 मध्ये त्याच्या पालकांसह राहत आहे. त्याचे वडील सुरेश कुमार हे शिक्षण विभागाचे निवृत्त अधिकारी आहेत आणि त्याची आई प्रभावती ही गृहिणी आहे असे अश्विनीने सांगितले.
हेही वाचा: Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र दाखल; सोनमवर गंभीर आरोप
पोलिसांनी सांगितले की, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला कुमार त्याची पत्नी अर्चना हिच्यापासून वेगळा राहित आहे. तसेच त्याचे आर्थिक वाद देखील असल्याचे समोर आले आहे. 2023 मध्ये अश्विनीच्या बिहारमधील फिरोज या मित्राने त्याच्याविरुद्ध पाटण्यातील फुलवारी शरीफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला तीन महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता.
कुमारने फिरोजला दहशतवादी प्रकरणात अडकवण्यासाठी त्याच्या नावाने धमकीचा मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी सात मोबाईल फोन, तीन सिम कार्ड, सहा मेमरी कार्ड होल्डर, एक बाह्य सिम स्लॉट, दोन डिजिटल कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असे पोलिसांनी सांगितले आहे.