मुंबई: राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून मुंबई जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालय (DPEMS) अंतर्गत झालेल्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, DPEMS अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी करण्यात येणाऱ्या तांदूळ वाहतूक कंत्राटात मेसर्स. श्री जे. बी. ग्रेन्स डीलर्स असोसिएशन या संस्थेने मोठ्या प्रमाणात तांदूळ तस्करी व निधी अपहार केला आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता व त्यांच्या विश्वस्त समितीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा ट्रस्ट सार्वजनिक असल्याचे भासवून प्रत्यक्षात तो गुप्ता कुटुंबीयांच्या मालकीचा खासगी व्यवसाय म्हणून वापरण्यात येतो, असा ठपका दानवे यांनी ठेवला आहे.
हेही वाचा:'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' -राज ठाकरेंचा संताप
ट्रस्टच्या माध्यमातून मिळणारा नफा गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा तसेच ट्रस्टच्या नावावर खाजगी गाड्या खरेदी करून त्या उपकंत्राटाद्वारे कामासाठी वापरण्यात आल्या आणि त्याच गाड्यांचे भाडे संस्थेकडून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वात गंभीर म्हणजे, दानवे यांच्या म्हणण्यानुसार DPEMS विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने या संस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा तांदूळ परदेशात, विशेषतः आफ्रिकेत तस्करी करण्यात आला आहे.या प्रकारामुळे केवळ सरकारी निधीचा अपव्यय झालेला नाही, तर विद्यार्थ्यांच्या पोषणासंबंधित योजनाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी दानवे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
हेही वाचा:Vidhan Bhavan Clash: विधानभवनात मारहाण करणारा ऋषिकेश टकले नेमका आहे तरी कोण?
या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील कारभारावर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा या प्रकरणात काय प्रतिसाद असतो आणि यानंतर सरकार कारवाई करते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.