Wednesday, August 20, 2025 06:19:08 PM

Asaduddin Owaisi : मालेगाव स्फोटप्रकरणी कोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी नाराज, थेट केंद्र सरकारला सवाल

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.

asaduddin owaisi  मालेगाव स्फोटप्रकरणी कोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी नाराज थेट केंद्र सरकारला सवाल

मालेगाव: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त) यांच्यासह, 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या निकालामुळे हिंदुत्त्ववाद्यांना दिलासा मिळाला आहे. अशातच, एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.

हेही वाचा: Malegaon Blast Final Verdict: साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

'या स्फोटात सहा नमाजी ठार झाले. यासह, सुमारे 100 जण जखमी झाले. त्यांच्या धर्मामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणात एनआयएने जाणूनबुजून निकृष्ट तपास केला आहे, ज्यामुळे आज या लोकांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे', अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली. '2016 साली या प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सार्वजनिकरित्या सांगितले होते की एनआयएने त्यांना आरोपींबद्दल सौम्य भूमिका घेण्यास सांगितले होते. तर 2017 मध्ये, एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तीच व्यक्ती 2019 मध्ये भाजप खासदार बनली', असं देखील ओवैसी म्हणाले. 

'एनआयए किंवा एटीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या सदोष तपासासाठी जबाबदार धरले जाईल का?', असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला. पुढे, ओवैसी म्हणाले, ' या प्रश्नाचे उत्तर आपल्या सर्वांना माहित आहे. दहशतवादाविरुद्ध हे कठोर मोदी सरकार आहे. भाजपने एका दहशतवादी आरोपीला खासदार बनवले हे जगाला आठवेल'. 

हेही वाचा: Nanded Crime News : नांदेड हादरलं; तरूणाने मुलीला भरदिवसा दुचाकीवर जबरदस्तीने उचलून नेले अन्...

सगळेच निर्दोष असतील तर...

'एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. सगळेच निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला?', असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला. 

पुढे, इम्तियाज जलील म्हणाले की, 'सुरुवातीला हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काम पाहत होते.देशातील एक चांगले अधिकारी म्हणून हेमंत करकरे यांची ओळख होती. पण दुर्दैवाने, काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हे सर्व प्रकरण बाहेर काढले होते. मात्र, त्यांची हत्या करण्यात आली. मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद असा एक शब्द समोर आला होता. एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. जर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरंच निर्दोष असत्या तर त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत कोणामध्ये होती? तसेच, आजच्या निकालाप्रमाणे तेव्हा आर्मीत सक्रिय असणारे लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना कोणी अडकवलं? या निकालामुळे देशाच्या सर्व न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी भाजपने भोपाळसारख्या एका राज्याच्या राजधानीत साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट देऊन निवडून आणलं. त्यांची पात्रता एवढीच होती की, त्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपी होत्या. आमच्याकडे आता काही चांगले लोक राहिलेले नाहीत. जे आरोपी आहेत त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेत बसवणार, असा संदेश भाजपकडून देण्यात आला होता'.


सम्बन्धित सामग्री