पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथून ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर मोदी शिवाजीनगर ते स्वारगेट असा मेट्रो प्रवास करून स्वारगेट येथे एसपी कॉलेज येथे सभास्थळी पोहचणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान २५, २६ सप्टेंबरला खासगी उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे. पुण्यात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मोदींची सभा आगामी निवडणुकांची नांदी असल्याची चर्चा आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहावेत यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या सभेला नागरिकांना येण्यासाठी शहरातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी बसेसची सुविधा उपलब्ध केले आहे.खासदार,आमदारांवर विशेष जबाबदारी देण्यात आले आहे.