मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने मराठा समाज आज आझाद मैदानात उपस्थित झाला आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे हजारोंच्या संख्यने आज मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
'जरांगेंच्या मागणीवर महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट...'
भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण?महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना, आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा कॅाग्रेस पक्ष आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पाहत आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत. आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
हेही वाचा: Maratha Protest: सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडू, मराठा आंदोलकांचा सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल
'ओबीसीच्या आरक्षणाला.....ही भाजपाची भूमिका'
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकार वर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उध्दव ठाकरे व कॅाग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी असे उपाध्ये यांनी म्हटले.
'फडणवीसांच्या नावाने टीका करुन काय साध्य...?'
केशव उपाध्ये म्हणाले, कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी सरकार आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजीनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत? मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले व सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही. शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी होती त्याला सहा महिने मुदत वाढ दिली. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी अशी मागणी होती ती सुध्दा जवळपास पूर्ण झाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी 8320 कोटींचे कर्ज वाटप केले. राजर्षी शाहू महाराज शुल्कप्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील 17.54 लाख विद्यार्थ्यांना 9262 कोटी दिले असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: Manoj Jarange Protest: जरांगेंच्या आंदोलनाला कोणत्या नऊ लोकप्रतिनिधींचा पाठिंबा?, आंदोलनासाठीच्या नेमक्या अटी काय?
'महाविकास आघाडीचे राजकारण हाणून पाडा'
मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्रजी व या उलट कोणतीही भूमिका न घेणारे कॅाग्रेस, उबाठा, शरद पवार… महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे हे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.