मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सध्या नवीन सत्ता स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे 1 लाख 59 हजार 60 मतांनी निवडून आले आहेत. 15 व्या विधानसभेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे ठाण्यातील किसन नगरचं शाखाप्रमुख झाले. तेथूनच शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि ते राजकारणात सक्रिय झाले. 1997 व 2002 मध्ये दोन वेळा नगरसेवक झाले. तीन वर्षे स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. ठाणे महानगरपालिकेत चार वर्षे सभागृह नेता म्हणून काम पाहिले आहे. 2004, 2009, 2014, 2019 अशा चार वेळा आमदार शिंदे आमदार म्हणून निवडून आले. विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते म्हणून त्यांनी 2014 ते 2019 काम पाहिले आहे. 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 त्यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले. 5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये मंत्रिमंडळात पहिल्यांदा त्यांना मंत्रिपद मिळाले. तसेच जानेवारी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार त्यांनी पाहिला होता. ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड घेण्यात आली. डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते झाले. त्यावेळी त्यांनी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2022 मध्ये राजकीय भूकंप झाला. शिंदे यांनी शिवेसना पक्ष फोडून भाजपासोबत जात 30 जून 2022 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.