मुंबई : राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने शाह यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर आता ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाकडून महापुरूषांचा होणारा अपमान संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमित शाहांवर कारवाई करावी. अन्यथा मोदींनी सत्ता सोडावी असा घणाघात ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपचे उर्मट नेते महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून सतत महापुरुषांचा अपमान होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
'भाजप अमित शाहांवर काही कारवाई करणार आहे का?'
राज्यसभेत अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केला त्याबद्दल भाजपा अमित शाहांवर कारवाई करणार का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. भाजपाचं ढोंग आणि हृदयातील काळं समोर आलं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढ्या उद्दामपणे शाह कसे बोलू शकतात याचं उत्तर द्यावं. त्याचबरोबर रामदास आठवले आता राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी आठवले यांनी केला आहे. बाबासाहेबांवर अमित शाहांसारखा माणूस तुच्छतेनं कसं बोलू शकतो? असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... https://www.jaimaharashtranews.com/politics/who-is-responsible-for-the-account-allocation-of-mahayuti/32025
काय म्हणाले अमित शाह?
राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले. यावरून अमित शाह आणि भाजपावर टीकास्त्र सोडले जात आहे.