मुंबई: सोमवारी, महाराष्ट्र विधानसभेत चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे आणि नीलेश राणे या दोघांत चांगलाच कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करताना विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत खूप संयम दाखवला आहे. आता त्यांनी मुंबईकरांच्या आणि शहरातील मागण्यांकडे लक्ष द्यावे, तसेच या ''चड्डी बनियान गँग''वर कठोर कारवाई करावी'.
यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे नीलेश राणे यांनी चड्डी बनियान शब्दावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. 'चड्डी बनियान शब्द रूलिंगमधून काढून टाकण्यात यावा', अशी मागणी केली. पुढे, नीलेश राणे यांनी आव्हान केले की, 'हिंमत असेल तर चड्डी बनियान गँग कोण हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करावे'. या वादामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: जयंत पाटील यांचा राजीनामा? शरद पवार गटाची प्रतिक्रिया
विधानसभेत काय काय घडलं?
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेत पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अबू आझमी यांनी आरोप केला की, 'असं वाटतंय की या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकारी नाही. चारही बाजूने मुस्लिमांना घेरलं जात आहे'.
विधानसभेत, मुख्यमंत्री फडणवीसांनी निवेदन केले की, 'युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत देशभरातील 12 गडकिल्ल्यांचा समावेश झाला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील एक जिंजी असे एकूण 12 गडकिल्ले आहेत'. पुढे फडणवीस म्हणाले की, 'युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. पंतप्रधानांकडे सात प्रस्ताव गेले होते. मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर केला'.