मुंबई : विधिमंडळाच्या बैठकीत गटनेतपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती सर्व आमदारांनी एकमताने केली आहे. त्यानंतर आता फडणवीसांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. या संदर्भात महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून राज्यपालांना पत्र देण्यात आले आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे तिघेही राजभवनावर उपस्थित होते. राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली. सर्वांनी समर्थनाचं पत्र दिलं, आभारी आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत. सर्व निर्णय एकत्रित घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. किती मंत्री शपथ घेणार हे संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘मंत्रिमंडळात राहावं यासाठी शिंदेंना विनंती केली’
सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यपालांकडे गेले होते. त्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. मंत्रिमंडळात राहावं यासाठी शिंदेंना विनंती केली असल्याची फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावी गेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून ते आजारी असल्याचे समजले होते. दरेगावाहून ठाण्याला परतले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. मंगळवारी ते ज्युपिटर रूग्णालयात गेले होते. पेशी वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला होता. सत्ता स्थापनेला अवघे काही दिवस उरले असताना शिंदेंचे आजारी पडल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. भाजपाचे नेते शिंदेंच्या बैठकीला गेले होते. त्यानंतर फडणवीस देखील शिंदेंच्या बैठकीला गेले होते. या बैठकीत सत्ता स्थापनेविषयी चर्चा झाली आणि त्यानंतरच आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.