मुंबई: एकीकडे, विधानमंडळात पावसाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस असताना दुसरीकडे, शुक्रवारी सायंकाळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. तसेच, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शुक्रवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केल्याने हा वाद आणखी पेटला.
नितीन देशमुख यांना अटक केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार मरीन ड्राइव्ह येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी, एका पोलिस अधिकाऱ्यात आणि आमदार रोहित पवार यांच्यात बाचाबाची होण्यास सुरुवात झाली. यादरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने रोहित पवार यांच्याशी बोलताना हातवारे करू लागला. हे दृश्य पाहताच रोहित पवार प्रचंड संतापले. त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला सुनावले, 'हातवारे करू नका, आवाज खाली ठेवा, शहाणपण करू नका. बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?'. हा प्रकार घडल्यानंतर, रोहित पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांना इशारा देत म्हणाले की, 'साहेबांना हात नाही लावायचं'. जेव्हा ही घटना घडत होती, तेव्हा जितेंद्र आव्हाडही मरीन ड्राइव्ह येथील पोलीस ठाण्यात उपस्थित होते'.
हेही वाचा: Kunal Kamra Controversy: विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं डिवचलं
नेमकं प्रकरण काय?
राजकारणातील प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधानभवनात गुरुवारी सायंकाळी दोन पक्षात तुफान हाणामारी झाली. बुधवारी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद-विवाद झाला. त्यानंतर, गुरुवारी चक्क विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने केली. या निदर्शनात आमदार रोहित पवार आणि अनेक कार्यकर्तेही आव्हाडांसोबत सामील झाले. यादरम्यान, शरद पवार गटाचे नेते असा दावा करतात की, 'विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की त्यांचे समर्थक नितीन देशमुख यांना कालचे कामकाज संपल्यानंतर सोडण्यात येईल'. मात्र, पोलिसांनी दोन्ही संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यामुळे संपूर्ण परिस्थिती आणखी चिघळली आणि मध्यरात्री निषेध झाला. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.